न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- तिसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरातील रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका, लॅब अॅस्टिस्टंट व इतर वैद्यकीय कर्मचारी बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वायसीएम तसेच, भोसरी रुग्णालयांतील कर्मचारी बाधित झाले आहेत; मात्र त्यांचे लसीचे दोन्ही डोस झाल्याने त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. बाधित कर्मचाऱ्यांनी कोविड झाल्यानंतर १५ दिवसांहून अधिक रजा घेतल्याने कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत.
त्यामध्ये जे वैद्यकीय कर्मचारी पॉझिटिव्ह असतील; मात्र त्यांना सौम्य लक्षणे असतील त्यांनी पाच ते सात दिवसांमध्ये कामावर रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या रुग्णांमध्ये लक्षणे आहेत; त्यांनी सात दिवसांनंतर लक्षणे नसतील तर कामावर रुजू व्हावे. ज्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आहेत त्यांची सात दिवसांनंतर आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. त्यामध्ये पुन्हा चाचणी सकारात्मक आली तर तीन दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यात यावी. ती निगेटिव्ह आल्यानंतर कामावर रुजू होण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय विभागांतील अधिकारी व कर्मचा-यांना तो नियम लागू आहे, असे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.


















