- पोलिसांच्या तक्रारीबाबत पोलीस आयुक्त स्वतः आढावा घेणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- सामान्यांच्या तक्रारींचा निपटारा करणाऱ्या पोलिसांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो साहेब, वैद्यकीय बिल, रजा, वेतनवाढ बदलीसाठी अडवणूक होत आहे, असे गान्हाणे काही कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसमोर मांडले. पोलीस आयुक्तालय प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रारही केली. किरकोळ बाबींसाठीही काही पोलीस कर्मचाऱ्यांची अडवणूक होत असल्याचे समोर आल्याने पोलीस आयुक्तांनी कपाळाला हात मारून घेतला.
पिंपरी – चिंचवड शहर पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी निगडी येथे पोलीस मुख्यालयात पोलीस दरबार झाला. पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब सहायक होते. कोरोना काळात काही पोलिसांनी वैद्यकीय रजा घेतली. उपचाराचा खर्च मिळण्यासाठी आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाकडे बिले सादर केली. तसेच रजा काळातील वेतन मिळावे, अशी विनंती केली. त्यातील त्रुटींची पूर्तता देखील केली. मात्र, आठ ते नऊ महिने होऊनही त्यांना वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्तीचे पैसे मिळाले नाहीत. तसेच वेतनवाढ, रोखण्यात आली, जिल्ह्यांतर्गत बदलीच्या अर्जाचीही अडवणूक केली असल्याच्या तक्रारी पोलिसांनी मांडल्या.
कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या विविध तक्रारीमुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीही नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची इतकी प्रकरणे प्रलंबित कशी राहू शकतात, असा प्रश्न त्यांनी प्रशासनातील संबंधित मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना केला. या तक्रारीबाबत सोमवारी (दि. ३१) आढावा घेऊ, असे आयुक्तानी सांगितले.


















