- मोशीतील कचरा डेपो परिसरात सुमारे ८१ एकर जागा राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील हॉटेलांमध्ये वाया गेलेले अत्रपदार्थ व ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १२ कोटी रुपये खर्च होणार आहे. पिंपरी – चिंचवड शहरात घरगुती कचऱ्यासह मंगल कार्यालय, कत्तलखाना, खानावळ उपहारगृह, हॉटेल व्यवसाय, फळे व भाजीपाला बाजार, फूलबाजार या व्यवसायामुळे घनकचरा निर्माण होतो. शहरात दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
महापालिका हद्दीत प्रतिदिन एक हजार मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. तेथील क्षेत्रात कचऱ्याची सुयोग्य विल्हेवाट लावली जाते. शहरात सुमारे २५ ते ३० ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेवर संकलन केंद्रे कार्यान्वित आहेत. शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापैकी ५० टक्के कचरा हा जैविक प्रकारचा असल्याने त्याचा गांडूळखत, बायोगॅस आदी पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठी वापर करता येणे शक्य आहे. निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे त्याच्या श्रोताच्या ठिकाणीच ओला व सुका कचरा अशा पद्धतीने वर्गीकरण व्हावे यासाठी महापालिकेने प्रभावीपणे जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
महापालिकेने जैविक कचऱ्याचा बायोगॅस प्रकल्पासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने हॉटेलमधील वाया गेलेले अन्नपदार्थ, ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविल्या. त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. या कामासाठी सहा ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये अवनी – डीएम ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २४.६२५ टक्के कमी म्हणजेच १२ कोटी ६ लाख रुपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा हा दर कमी असल्याने या ठेकेदाराबाबात करारनामा करून काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.












