- स्थायी समिती सदस्य निवडीचाही पेच तसाच; आता नवे गडी नवे राज्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- महापालिकेची सर्वसाधारण सभा १७ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ च्या पंचवार्षिकेची मुदत १३ मार्चला संपत आहे. त्यामुळे पुढील सर्वसाधारण सभा नव्या पंचवार्षिकत होईल. परिणामी, स्थायी समितीतील आठ सदस्यांमार्फत मार्चमधील १३ दिवसांचे कामकाज चालेल. सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
भारतरत्न लता मंगेशकर, उद्योजक राहुल बजाज, माजी मंत्री सुधीर जोशी, माजी खासदार गजानन बाबर तसेच, गजानन चिंचवडे व इतर दिगवंत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा १७ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. सभेत स्थायी समितीच्या ८ सदस्यांची निवड करण्यात आली नाही. भाजपचे शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बोर्डे, भीमाबाई फुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पौर्णिमा सोनवणे व सुलक्षणा धर या ८ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. त्या अगोदर नव्या ८ सदस्यांची निवड न झाल्याने मार्च महिन्यात उर्वरित ८ सदस्यांमार्फत स्थायी समितीचे कामकाज चालणार आहे.
त्यामुळे केवळ १३ दिवसांसाठी स्थायी समिती सदस्यपदाची आस लावून बसलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. शुक्रवारची सभा १७ मार्चपर्यंत तहकूब केली आहे. महापालिका १४ मार्चला बरखास्त होत आहे. त्यामुळे ही अखेरची सर्वसाधारण सभा ठरली. आता पुढील सर्वसाधारण सभा महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर नव्या सदस्यांच्या सभागृहात होणार आहे.