- उद्या रविवार पालिकेच्या वतीने शहरात सायक्लॉथॉनचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- पर्यावरण आणि स्वच्छाग्रह उपक्रमाचा संदेश सायकल स्पर्धेच्या माध्यमातून देण्यासाठी रविवार दि. २७ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या वतीने सायक्लॉथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी जाहीर केले. यामध्ये जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी सहभाग घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये सायक्लॉथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडाधिकारी अनिता केदारी, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, विलास देसले, बाबासाहेब गलगले, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, सुनिल पिंजण, दिपक साळुंके, इंडो अॅथलेटिक सोसायटीचे अजित गोरे, वृक्षवल्लीचे संस्थेचे माधव विभुते, संजय चाटे, लायन्स क्लबचे दामू आसबे तसेच सायकलींग संघटनेचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.
शहरातील सायकल मार्ग तयार करण्यासाठी महापालिकेने खर्च केला आहे. या मार्गाचा वापर त्याच कारणासाठी होणे गरजेचे आहे. यासाठी या मार्गावर इतर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे निर्देश महापौर माई ढोरे यांनी दिले. सायकल चालविणा-यांना प्रोत्साहन मिळावे याकरीता शहरात सातत्याने सायकल स्पर्धांचे आयोजन करण्याच्या सूचना महापौर माई ढोरे यांनी दिल्या. सध्या शहरात स्वच्छाग्रह मोहिम राबविली जात आहे. शहराला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्यासाठी या मोहिमेमध्ये नागरी सहभाग वाढण्यासाठी सायक्लॉथॉनचा उपयोग होणार आहे. कल्पतरु सोसायटी ते वाकड असा स्पर्धेचा मार्ग असणार आहे. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सायकल आणि पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम महापालिका सातत्याने राबवित आहे. सायक्लॉथॉनच्या माध्यमातून सायकल चालविणा-यांना प्रोत्साहन मिळेल, सायकलचा वापर करणा-यांची संख्या निश्चितपणे वाढेल असा विश्वास आहे. शहरातील सायकल ट्रॅक वापरात येण्यासाठी महापालिकेने तयार केलेले सायकल ट्रॅक नागरिकांना माहित होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक भागात सायकल स्पर्धा राबविण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल. यामध्ये सर्व घटकांना सहभागी करुन घेतले जाईल.
बैठकीमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सूचना मांडल्या. यामध्ये सायकलचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करणे, नागरिकांना प्रोत्साहित करणे, सातत्याने स्पर्धांचे आयोजन करणे, पर्यावरणाचा संदेश देणे आदी सूचनांचा समावेश होता.