- हरकतींवर सहकार आयुक्तांसमोर शुक्रवारी सुनावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२२) :- आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर तब्बल ५ हजार ६७४ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हरकतीचे वर्गीकरण करण्यास विलंब झाला आहे. तो अहवाल सोमवारी (दि. २१) राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाईल. त्यानंतर शुक्रवारी (दि. २५) त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.
आराखडा १ फेब्रुवारीला प्रसिद्ध करून १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात आल्या. तब्बल ५ हजार ६७४ हरकती दाखल झाल्या. एकच प्रभाग व विशिष्ट कारण असलेल्या हरकती एकत्रित केल्या आहेत. तसेच, हद्द, वर्णन, नाव व इतर कारणांसाठी असलेल्या हरकतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने हरकती प्राप्त झाल्याने त्यांचे वर्गीकरण करण्यास दोनऐवजी सहा दिवस लागले. अहवाल सोमवारी (दि. २१) आयुक्त राजेश पाटील यांच्या सहीने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार आहे.
हरकतींवर राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासमोर शुक्रवारी (दि. २५) सुनावणी होणार आहे. हरकतींची संख्या विक्रमी असल्याने एका दिवसात सुनावणी होऊ न शकल्यास आणखी एक दिवस वाढविण्याची शक्यता आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा अहवाल २ मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात प्रभागरचनेचा अंतिम आराखडा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभागरचनची तोडफोड केल्याने काही जण न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
















