- अनधिकृत बांधकाम स्वतः काढा अथवा नियमित करा; प्रशासनाचा रेटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक मुदतीत झाली नाही. नगरसेवकांचा कालावधी १३ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये निवडणूक होईल असा अंदाज आहे. निवडणुकीच्या धामधुमीत अनधिकृत जनसंपर्क कार्यालये थाटणाऱ्या सरसकट नगरसेवकांना महापालिका प्रशासनाने नोटीस देण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
अनधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या जात आहेत. आपले जनसंपर्क कार्यालय असलेली इमारत कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत आहे. त्याचा अनधिकृतरित्या वापर सुरु आहे. तो थांबवावा. अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाकावे. अथवा नियमित करुन घ्यावे, असे नोटीसीत म्हटले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसह इच्छुकांनीही दोन ते तीन जनसंपर्क कार्यालये केली आहेत. काहींनी पत्राशेड, महापालिका जागेत, फूटपाथवर अनधिकृतपणे जनसंपर्क कार्यालये थाटली आहेत. त्याबाबत प्रभागांतील विरोधक आणि इच्छुकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाने सर्वेक्षण केले. त्यानुसार अनधिकृत जनसंपर्क कार्यालय थाटलेल्यांना नोटीस दिल्या जात आहेत.
महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार प्रभागस्तरीय नोटीस दिल्या जात आहेत. अनधिकृत असलेल्या प्रत्येक जनसंपर्क कार्यालयाला वेगळी नोटीस दिली जाईल. आत्तापर्यंत किती जनसंपर्क कार्यालयांना नोटीस दिल्या. याबाबत आकडेवारी तूर्तास सांगता येणार नाही – मकरंद निकम, सह शहर अभियंता…












