न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- शहराची लोकसंख्या आणि तुलनेने रोजगारासाठी येणा-यांची संख्या पाहता सर्व वैद्यकीय बोजा वाय. सी. एम. रूग्णालयावर पडत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे डॉक्टरांची कमतरता भासते व रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भोसरी येथे नवीन रुग्णालयाचे काम सुरु आहे. तसेच भोसरीतील सर्वसामान्य व गरीब रुग्णांना हे रुग्णालय वरदानच ठरणार आहे.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे हे रुग्णालय खाजगी तत्वावर देण्यासाठी राजकीय हस्तक्षेप वाढला होता व त्यास विविध सामाजिक संघटनांकडून विरोधही होत होता. आज सोमवार (दि. २) रोजीच्या सर्वसाधरण सभेपुढे चर्चेसाठी भोसरी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा विषय ठेवलेला होता. नागरिकांच्या आरोग्य समस्येशी निगडीत हा महत्वाचा विषय होता. मागील काही तासात संतपीठाच्या विषयावरून सभेत गोंधळ उडाला होता.
तहकूब सभा तासानंतर चालू झाली. या महत्वाच्या विषयावर यथासांग चर्चा होणे अपेक्षित असताना, सत्ताधारी भाजपचे महापौर राहुल जाधव यांनी या विषयास विनाचर्चा मान्यता दिली. तीही केवळ १० मिनिटात. भाजपच्या या एककल्ली कारभारामुळे महत्वाच्या प्रश्नांचीही या मुजोरपद्धतीने खिल्ली उडवली जाणार असेल, तर सभेची आवश्यकताच काय? असा सवाल काही नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.











