न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा आज सोमवार (दि. ४ ) रोजी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाचा विषय महापौरांच्या मान्यतेसाठी पटलावर होता.
राष्ट्वादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने हे या विषयावर बोलत असताना संतपीठ निविदेच्या कामात रिंग झाली असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला व पुढे बोलत असतानाच, माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यात हस्तक्षेप करीत, साने यांना पुढे बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे आपल्याला गाफील ठेऊन विषय मंजुरीचा प्रयत्न होत असल्याचे विरोधकांच्या लक्षात आले व त्यामुळे गोंधळ उडाला.
या गोंधळातच महापौर राहुल जाधव यांनी उपसूचनेसह संतपीठ विषयाच्या ठरावास मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक व साने यांनी आक्रमक होऊन महापौरांच्या पुढ्यात येऊन, राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी आसन सोडले व ते निघून गेले. त्यानंतर एक तास सभा तहकूब करण्यात आली होती.















