न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहर कार्यक्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांना अन्न धान्य पुरवठा पावत्या न देता, त्यांची फसवणूक करीत आहेत. या स्वस्त धान्य दुकानदारांवर तात्काळ कारवाई करावी, याकरीता शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने निगडीतील परिमंडल ३ चे अन्न पुरवठा अधिकारी तावरे यांना तक्रारीचे पत्र दिले आहे.
यात म्हटले आहे की, प्रामुख्याने रहाटणी काळेवाडी परिसरामध्ये स्वस्त धान्य (रेशनिंग) धारकांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून पावत्या न देण्याचे प्रमाण वाढलेल आहे. त्यातच ज्योतिबानगर, तापकीरनगर व श्रीनगर या परिसरामध्ये हे प्रमाण अधिकच वाढलेल आहे.
त्यामुळे आपण स्वतः याची गांभिर्याने दखल घेऊन, सर्वसामान्य जनतेसाठी २१ दिवसांच्या आत कारवाई न केल्यास, शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने परिसरातील माता-भगिनींना सोबत घेऊन, जन आंदोलन केले जाईल. या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी आपली राहिल. तेव्हा मुदतीच्या आत आपण लेखी उत्तर द्यावे, असे युवराज दाखले यांनी या पत्रात म्हटले आहे.











