- पदाधिकाऱ्यांच्या दालनांना लागणार कुलूप..
- पालिका नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे नामफलकही हटवणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ च्या पंचवार्षिकेचा कालावधी रविवारी (दि. १३) संपत आहे. त्यामुळे सोमवार (दि. १४) पासून महापालिकेचे कामकाज प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील हे पाहणार आहे. त्या दिवसांपासून पालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते यांच्यासह १२३ नगरसेवक हे माजी होणार आहेत. पालिकेतील नगरसेवकांची मुदत रविवारी रात्री बाराला संपत आहे.
सर्वसाधारण सभा व स्थायी व समितीची सभा होणार नसल्याने त्याचे सर्व अधिकारी आयुक्तांकडे जाणार आहे. विभागाने सादर केलेले काम पालिकेच्या तांत्रिक समिती, निविदा समिती, दक्षता नियंत्रण समिती अशा पातळीवरून पुढे सरकणार आहे. नगरसचिव विभागाकडून कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आयुक्त व प्रशासन म्हणून सर्व अधिकार आयुक्तांच्या हातात असणार आहेत. सर्वसाधारण सभेचे तहकूब विषय तसेच सन २०२२-२३ च्याअर्थसंकल्पावर तेच निर्णय घेतील. मात्र, धोरणात्मक निर्णय व खर्चिक प्रकल्प, योजना व कामांबाबत आयुक्तांना राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे सुत्रांनी सांगितले.
महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता, स्थायी समितीचे अध्यक्ष, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, शिक्षण व क्रीडा या विषय समिती सभापती, शिवसेना, मनसे, अपक्ष आघाडीचे गटनेते यांच्या दालनांना सोमवारी (दि. १४) कुलूप लावले जाणार आहे. दालनावरील त्यांचे नामफलक काढण्यात येतील. तेथील लिपिक व कर्मचारी इतर विभागात वर्ग केले जातील. पदाधिकाऱ्यांकडील पालिकेची वाहने ताब्यात घेतली जाणार आहेत. तसेच, शहरात सर्वत्र लावण्यात आलेले नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे नामफलक काढून घेण्यात येणार आहेत. पदाधिकारी व नगरसेवक म्हणून महापालिकेचे लोगो असलेले लेटरहेड वापरणे कायद्याने बंदी असणार आहे. मात्र, माजी नगरसेवक नागरिक म्हणून तक्रार किंवा सूचना प्रशासनाला देऊ शकतील. निवडणुका होईपर्यंत प्रशासक राज महापालिकेची निवडणूक होऊन पहिली सर्वसाधारण सभा होईपर्यंत आयुक्त प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत.












