- चोरांकडून पालिकेच्या पंपिंग स्टेशनमधील इलेक्टिक साहित्यांची चोरी?..
- नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये प्रकार उघडकीस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२२) :- निगडी भक्ती शक्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज भव्य उड्डाण पुलामुळे संपूर्ण राज्यात प्रचलित झाला आहे. भक्ती शक्ती समूहशिल्प परिसरातील उद्यान, तसेच दुभाजकातील उद्यान हिरवाईमुळे उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे लक्ष वेधले जाते. ह्या सर्व वृक्षवल्लीला जीवदान देण्याचे अमूल्य काम गेल्या अनेक वर्षांपासून समुहशिल्पाजवळील पालिकेची विहिर करत आहे.
या विहिरीवर त्यासाठी पिंपरी महापालिकेच्या वतीने छोटे पंपिंग स्टेशन उभे केले आहे. त्यासाठी दोन मोटारींची व्यवस्था केलेली आहे. परंतु सुरक्षा व्यवस्था परिपूर्ण नसल्यामुळे बऱ्याच वेळा परिसरातील भुरटे चोर या इलेक्टिक साहित्यांची कुलूप तोडून चोरी करतात आणि पुन्हा तिथेच बसून दारूची पार्टी करतात. दररोज गावठी दारूची “पण्णी ” आणायची आणि यथेच्छ पार्टी करायची, असा सर्रास उद्योग गेल्या वर्षांपासून सुरू आहे. काही मीटर अंतरावर निगडी पोलिस ठाणे आहे हे पण विशेष आहे. ह्या संदर्भात स्थानिक गुंडही अश्या भूरट्यानां बळ देतात. त्यामुळे संध्याकाळी ह्या ठिकाणाहून जाणाऱ्या महिलासुद्धा असुरक्षित झाल्या आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे सध्या पालिकेच्या ह्या विहिरीचा “ताबा” पण्णीपंटर दारुड्यांकडे आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विजय पाटील म्हणाले,” निगडी भक्ती शक्ति उद्यान परिसरात तसेच प्राधिकरणातील सेक्टर २८ मधील संत ज्ञानेश्वर उद्यानात पाणी पूरवठा पूर्णपणे बंद झाल्यामुळे झाडे सुकू लागली होती. त्या संदर्भात तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सत्य परस्थिती सांगितली. भुरटे चोर या ठिकाणच्या नसलेल्या सुरक्षाव्यवस्थेमुळे मोटारींच्या पार्टसची चोरी करतात व संध्याकाळी पुन्हा याच विहिरीच्या ठिकाणी बसून दारूची पार्टी करतात. त्याकरिता निगडी परिसरातील प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे पोलीस मित्र, एस. पी. ओ. विशाल शेवाळे, तेजस सापरिया, राजेश बाबर, अजय घाडी, संतोष चव्हाण या कार्यकर्त्यांनी गस्ती दरम्यान जागेवर जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि दारुडेही आढळले, त्यांनी हटकले असता तिथून त्यांनी काढता पाय घेतला. गेल्या काही दिवसात हजारो रुपयांचा गंडा या भुरट्या चोरांनी घातला आहे. त्यामुळे विहीर परिसर अश्या दारुड्यांपासून मुक्त करणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने याची गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे. बंद असलेल्या पाणी पुरवठा संदर्भात १२ मार्च ला “सारथी” वर तक्रार सुद्धा दाखल केली आहे.”











