- थकीत एलबीटी न भरल्यास मिळकत जप्तीची होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२२) :- शहरातील एलबीटी (स्थानिक संस्था कर) थकबाकीदारांना महापालिकेने जप्तपूर्वी नोटीसा बजावल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत थकीत एलबीटी न भरल्यास मिळकत जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा उपायुक्त स्मिता झगडे यांनी सोमवारी (दि. १४) दिला आहे.
शहरात १ एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू झाला आहे. तो कर ३० जून २०१७ ला रद्द करण्यात आला. महापालिकेकडे आज अखेर ३५ हजार ९२ व्यावसायिकांनी एलबीटीची नोंदणी केली आहे. त्यापैकी आजअखेर २३३ व्यावसायिकांनी एलबीटी भरला आहे.
एलबीटीधारकांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ १० टक्के व्यावसायिकांनी कागदपत्रे सादर केली आहेत. एकूण ५ हजार २३८ व्यावसायिकांना विभागाच्या तीन पथकांमार्फत नोटीसा देण्यात येत आहेत.












