- देवस्थानकडून कार्यक्रम जाहीर; प्रशासनाकडून तयारीची लगबग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२२) :- देहूतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा ३७४ वी तुकाराम बीज रविवारी (दि. २० ) देहूत साजरी होत आहे. देवस्थानकडून तुकाराम बीज कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वैकुंठ स्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर या ठिकाणी कीर्तन होणार आहेत. सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वैकुंठ स्थान मंदिरासमोर भजनी मंडपात वैकुंठ सोहळा कीर्तन होईल.
देहूमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या तुकाराम बीजेनिमित्त बुधवार (दि. १६) अंतिम आढावा घेण्यात आला. आपती व्यवस्थापन आदेशानुसार बीज साजरी होणार असून, नगरपंचायतीकडून तयारी सुरू आहे, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.
देहू गावाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर महापालिकेतर्फे ५०० पथदिवे बसविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात हायमास्ट दिवे नगर पंचायतीच्या वतीने लावण्यात येणार आहेत. नदीपात्रात लक्ष ठेवण्यासाठी फ्लड लाइटचा उपयोग केला जाईल. जेणेकरून नदीपात्रात कोणी पडल्यास अथवा काही हानी झाली तर मदत करणे सोपे जाईल. मंदिर परिसर, भक्त निवास व पालखी मार्ग या ठिकाणची स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पाण्याचे ११ टँकर तैनात करण्यात येणार आहेत. बीजेच्या काळात भाविकांची गर्दी होते त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून तात्पुरती शौचालय उभारण्यात येतील. ती गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतील. भाविकांच्या सुविधेसाठी देहू परिसरात सुमारे चाळीस दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. या कामी नगर पंचायतीचे २८ कर्मचारी कार्यरत असून बाहेरून दहा कर्मचारी मागविण्यात आले आहेत. वैद्यकीय विभागाने नियोजन केले आहे वैकुंठस्थान मंदिर, मुख्य मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग सुरू राहतील. पैकी देहू प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग २४ तास खुला असेल. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या तैनात असतील. नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. नदीपात्रात क्लोरीन सोडण्यात आले असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या, या यात्रेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पाच पोलिस निरीक्षक, २० उपनिरीक्षक/ सहाय्यक पोलिस निरीक्षक, २५० पोलिस कॉन्स्टेबल, एस आर पी एफ च्या दोन तुकड्या, यासोबत साध्या वेषातील पोलिस, खंडणी विरोधी पथक आदींचा ताफा असेल. मंदिरात यात्रेपूर्वी बॉम्बशोधक व नाशक पथक तपासणी करेल. संस्थानच्या वतीने १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वैकुंठस्थान मंदिरातही सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर असेल. इंद्रायणीवरील पुल बंद केला जाणार आहे, असे स्पष्ट आदेश आहेत.
तुकाराम बीज सोहळा :-
पहाटे ३ – काकडा आरती.
पहाटे ४ – मुख्य मंदिरात श्रींची महापूजा, व शाळा मंदिरातील महापूजा- संस्थांचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते होईल.
सकाळी ६ – वैकुंठ स्थान मंदिरात तुकाराम महाराजांची पूजा – तुकाराम महाराजांचे वंशज व वारकरी यांच्या हस्ते.
सकाळी १०.३० – पालखी प्रस्थान (वैकुंठ स्थान मंदिराकडे)
सकाळी १० ते १२ – देहूकर महाराजांचे वैकुंठ सोहळा कीर्तन.
१२.३० वा. – पालखीचे वैकुंठ स्थान मंदिराकडून मुख्य मंदिराकडे आगमन…












