- निगडीतील घटना; आरोपींवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२२) :- दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयते, दांडके आणि दगडाने वाहनांची तोडफोड केली आहे. तसेच परिसरात दहशत निर्माण करून त्याला विरोध करणाऱ्या इसमाकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेतले. ओटास्किम, निगडी येथे रविवारी (दि. २०) रात्री ही घटना घडली.
राधाकिशन अच्युत खरात (ओटास्किम, निगडी) यांनी रविवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आदर्श उर्फ छोट्या अशोक मगर, डॅनी पठाण, जाकिर पठाण, विशाल ऊर्फ ठेंगळ्या खरात, विशाल ऊर्फ विठ्ठल पायाळ, सचिन ऊर्फ गुलाब जाधव, धनंजय ऊर्फ बबलु रणदिवे, सोन्या ऊर्फ भाव्या किशोर बाविस्कर, बज्या, ऋतीक सकट, करण डोंगरे आणि इतर दोन ते तीन अनोळखी आरोपी (सर्व रा. ओटास्किम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ओटास्किम, निगडी परिसरात हातात कोयते, दांडके आणि दगड वाहनांवर घालून वाहनांची तोडफोड केली. फिर्यादी यांनी आरोपींना विरोध केला असता फिर्यादी राधाकिशन यांना अश्लील शिवीगाळ केली व त्यांच्या खिशातून जबरदस्तीने ५६०० रुपये हिसकावून घेतले असे फिर्यादीत नमूद केले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.