- दिवसभर चक्राकार पध्दतीने भारनियमनाला जावे लागले सामोरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२२) :- महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात एका मांजरामुळे सकाळी सहाच्या सुमारास तांत्रिक बिघाड होऊन भोसरी, आकुर्डी व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. महापारेषणच्या भोसरी येथील २२० के. व्ही. अति उच्च दाब उपकेंद्रातील १०० एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही. च्या यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे हा बिघाड झाला होता.
भोसरी, आकुर्डी व परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, २२० के. व्ही. उपकेंद्रातील ७५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रावर महापारेषणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित वीजपुरवठा हा २२० के. व्ही. भोसरी २ उपकेंद्रातून सुरळीत करण्यात आला.
महापारेषण कंपनीच्या २२० के. व्ही. अति उच्च दाब भोसरी १ उपकेंद्रामध्ये सध्यस्थितीत १०० एम.व्ही.ए. क्षमतेचे एक व ७५ एम. व्ही.ए. क्षमतेचा एक असे एकूण दोन विद्युत रोहित्रे आहेत. या दोन विद्युत रोहित्राव्दारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, यातील १०० एम.व्ही.ए.च्या रोहित्रामध्ये सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही. यार्डमधील चालू वीज उपकरणावर मांजर चढल्यामुळे बिघाड झाला. परिणामी प्रामुख्याने भोसरी एम.आय.डी.सी. भोसरी परिसर, आकुर्डी परिसरात चक्राकार पध्दतीने भारनियमन करावे लागले.












