न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने भोसरी येथील रुग्णालय खाजगी तत्वावर चालविण्यास देण्याबाबतचा निर्णय घेतला असून, गोरगरिबांसाठी या रुग्णालयाची निर्मिती केलेली असताना, अचानक महापालिकेने खाजगीकरणाचा घाट कोणाकरीता घातला आहे. तसेच महापालिका हे रुग्णालय चालविण्यासाठी सक्षम नाही? यात गौडबंगाल काय? असा सवाल मनसेचे गटनेते व शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले असून, यात म्हटले आहे की, नव्याने उभारणी होत असलेले सुसज्य रुग्णालय लवकरच चालु करण्यात येत आहे. हे रुग्णालय महानगरपालिका न चालवता सत्ताधारी पक्षाने रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्याचा घाट घातला आहे. सोमवार (दि. ४) रोजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यामध्ये विषय क्र. ५ भोसरी रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास देण्याचा विषय होता. परंतु, सत्ताधारी पक्षाने कोणत्याही नगरसेवकांचे म्हणणे न ऐकता हा विषय मंजूर करून घेतला. या विषयामध्ये भरपूर तफावत आहे. त्यामुळे रुग्णालय खाजगी संस्थेस देण्यास आमचा विरोध राहील.
यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, रूपेश पटेकर, राजू सावळे, सुरेश सकट, के. के. कांबळे, रवी जाधव, मिनाताई गटकळ, सीमा बेलापुरकर, रूपाली गिलबिले, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, संगिता देशमुख, दक्षता क्षीरसागर, प्राजक्ता गुजर, पंकज दळवी, गणेश पाटिल, रोहित काळभोर, मयूर हजारे व आदी मनसेचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
तसेच हे रुग्णालय कोणत्या संस्थेस चालवण्यास देणार आहे? हे कोणालाही माहीती नाही. रुग्णालय खाजगी संस्थेस ३० वर्ष चालवण्यासाठी देण्यात येणार आहे, यास आमचा विरोध राहील. या रुग्णालयामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. आमचे असे म्हणणे आहे की, शहरातील सर्व नागरिकांना उपचार व सोयी-सुविधा मोफत मिळावे व वायसीएमच्या धर्तीवर चालविण्यात यावे. हे रुग्णालय खाजगी संस्थेस चालवण्यास दिले, तर त्यापासून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळे महापालिकेत मंजूर केलेला भोसरी रुग्णालयाच्या खाजगीकरणाचा विषय क्र. ५ आयुक्तांनी रद्द करून, पुन्हा एकदा चर्चेसाठी सभागृहात आणावा, असे या पत्रात म्हटले आहे.











