- पालिकेचे कार्यकारी अभियंता यांची माध्यम प्रतिनिधीला धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता विजय काळे यांनी पत्रकार गणेश मोरे यांना “तुझ्या विरोधात पोलीस केस दाखल करून आत घालीन” असा धमकीवजा इशारा दिल्याची माहिती समजते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “फ” प्रभागाचे कार्यकारी अभियंता विजय काळे हे अटल बिहारी उद्यानाचे स्थापत्य विषयी काम पाहत आहेत. या उद्यानाचे उदघाटन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ मार्च रोजी झाले. या उद्यानाचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. तब्ब्ल २० दिवसानंतरही या उद्यानाचे काम चालू असल्याने त्या संदर्भात शिवसेना व भ्रष्टाचार निर्मुलन समितीने आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली.
याबाबत माहिती घेण्यासाठी news15 या न्युज चॅनेलचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी गणेश मोरे हे प्रतिक्रिया विचारण्यास गेले असता उद्यानाबाबत माहिती न देता उलट “तुम्ही पत्रकार उद्यानाबाबत चुकीच्या बातम्या छापून माझी बदनामी करताय, मी तुम्हाला सोडणार नाही, माझी बदनामी केली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्या विरोधी पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल करून आत घालीन, उठा शहाणे बना” असे उद्धटपणे उत्तर देऊन अपमानित केले, अशी माहिती पत्रकार मोरे यांनी दिली आहे.
















