- पोलीस आयुक्तांच्या नावाने बदलीसाठी पैशांची मागणी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२२) :- एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात एक फोन आला. आपण पोलिस आयुक्तालयातून पाटील बोलत असल्याचे सांगत पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे व मोबाईल क्रमांक घेतले. त्यानंतर भामट्याने त्या कर्मचाऱ्यांना फोन सुरु केले.
तुमचा येथील कालावधी पूर्ण झाला असून तुमची बदली होणार आहे. तुम्हाला कुठे बदली हवी आहे, तेथे तुम्हाला नियुक्ती मिळेल, मात्र, त्यासाठी आयुक्त साहेबांना पैसे द्यावे लागतील, मला सर्व माहित आहे, मी साहेबांचा माणूस असून तुमचे काम करून देतो, असे भामटा सांगत होता.
दरम्यान, एका महिला हवालदाराने ऑनलाइनद्वारे काही पैसे पाठविले. काही वेळाच्या अंतरातच कर्मचाऱ्यांना फोन येऊ लागल्याने संशय आला. त्यानंतर समोरचा व्यक्ती भामटा असल्याचे समोर आले. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याना कळविल्यानंतर एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.
















