- ‘सौदागर क्रिकेट प्रीमियर लीग’ स्पर्धेवर महिला खेळाडूंची छाप..
- ”रोझ व्हॅली महिला” संघाने पटकावले विजेतेपद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२२) :- पिंपळे सौदागर येथे ‘सौदागर क्रिकेट प्रीमियर लीग’ स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात ” रोझ व्हॅली महिला ” संघाने ”सुखवानी सिलेनो” या संघाचा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकावले.
सौदागरमधील सोसायटी धारकांसाठी सौ. अनिताताई संदीप काटे आणि निलेश काटे युवा मंचच्या वतीने फुलपीच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले होते. या प्रीमियर लीगमध्ये ७५ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यांची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक करून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे स्वागत केले, तर उद्योजक संदीप काटे आणि निलेश काटे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेबाबत माहिती देताना अनिताताई संदीप काटे म्हणाल्या, कोरोनाच्या साथीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ते आता पूर्वपदावर येत आहे. कटू अनुभव विसरून नागरिकांनी एकत्र यावे यासाठी पिंपळे सौदागर येथील सोसायटी धारकांसाठी ‘सौदागर क्रिकेट प्रीमियर लीग’ स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला सौदागरमधील सोसायट्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विशेषतः महिला खेळाडूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांनी आपल्या चुणूकदार खेळाचे दर्शन घडवीत संपूर्ण स्पर्धेवर आपली छाप सोडली. स्पर्धेच्या निमित्ताने एकंदरीतच निवडणुकीआधीच पिंपळे सौदागरमध्ये महिलाराजची अनुभूती येत होती. परिसरातील सोसायटींच्या सहभागामुळे अतिशय शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक ही स्पर्धा पार पडली. गेल्या तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. अतिशय चुरशीची झालेली फायनल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.
विजेत्यांसह उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन…
महिलांमध्ये प्रथम क्रमांक ” रोझ व्हॅली महिला “संघाने व दुतीय क्रमांक ” सुखवानी सेलेनो महिला ” या संघाने पटकावला. पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक “अजिंक्य भिसे स्पोर्ट फॉऊंडेशन” या संघाने तर, द्वितीय क्रमांक ” रोझ आयकॉन ”, तृतीय क्रमांक ” SM थंडर ” या संघाने व चतुर्थ क्रमांक ” लक्षदीप पॅलेस ” या संघाने पटकावला. विजेत्या संघांना बक्षीसे देण्यात आली. यासह सलग तीन विकेट, सलग तीन चौकार, सलग तीन षटकार, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशा गुणवंत खेळाडुंनाही रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आली.