- सर्वसामांन्यांचे मात्र कंबरडे मोडणार; नव्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरात मिळकत खरेदी केल्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून मिळकत हस्तांतर शुल्क म्हणून स्टॅप ड्युटीच्या (नोंदणी मुद्रांक शुल्क) अर्धा टक्का शुल्क आकारले जाणार आहे. नोंदणीनंतर तीन महिन्यांत शुल्क न भरल्यास शुल्काच्या २० टक्के दंड दरवर्षी आकारला जाणार आहे. त्यांची अंमलजावणी शुक्रवारी (दि. १) पासून केली जाणार आहे. त्या नव्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मिळकत हस्तांतरण शुल्क आकारणीस मंजुरी देण्यात आली आहे.
शहराचा वाढता विस्तार व होणारे नागरीकरण नागरी सुविधा व विकासकामावर होणारा खर्च या बाबी विचारात घेऊन पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी कर संकलन विभागाने वरील प्रस्ताव सादर केला होता. खरेदीखत, विक्री किंवा बक्षीसपत्र यासारख्या दस्त नोंदविताना रजिस्टर स्टॅप ड्युटी विभागामार्फत त्या मिळकतीचे चालू बाजारभावाने मूल्यांकनावर (रेडी रेकनर) आधारित किंमत ठरवून त्या किंमतीवर स्टॅप ड्युटी वसुल केली जाते. सन २०२२-२३ पासून दस्तऐवजानुसार स्टॅप ड्युटी ठरविण्यासाठी शासनाने जे बाजारमूल्य विचारात घेतले आहे. त्या बाजारमूल्याचे ०.५० टक्के (अर्धा टक्का) मिळकत हस्तांतरण शुल्क आकारण्यात येणार आहे.
मयत किंवा रक्तसंबधी कौटुंबिक वाटणीपत्र, बक्षीसपत्र, वारसा हक्क प्रमाणपत्र अशा प्रकरणी जिथे प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार घडून आलेला नाहीत तिथे स्टॅप ड्युटी व हस्तांतरण शुल्क म्हणून ५०० रुपये आकारले जाणारआहे. मिळकत हस्तांतरण झाल्यानंतर तीन महिन्यात आणि नातेसंबंधात एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्यास हस्तातरण शुल्काच्या १० टक्के विलंब दंड दरवर्षी लावला जाणार आहे. त्यासाठी हस्तांतरण शुल्क विलंब शुल्क नावाने नवीन लेखाशिर्ष निर्माण केले जाणार आहे. त्यास मंजुरी दिली.
मिळकत हस्तांतर शुल्काच्या नव्या नियमामुळे शहरातील खरेदी किंवा हस्तांतरीत झालेल्या नव्या व जुन्या मिळकतींची नोंद महापालिकेकडे करणे सक्तीचे होणार आहे. त्यामुळे मिळकतीची नोंद न करण्याच्या प्रवृत्तीस काही प्रमाणात आळा बसणार आहे. महापालिका मिळकत नोंदणीची माहिती नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडून घेणार आहे. शुल्कामुळे घर खरेदी करणाऱ्यांवर आर्थिक ताण वाढणार आहे. दुसरीकडे, महापालिकेचे उत्पन्न दरवर्षी वाढणार आहे.