- आर्थिक वर्षात १६५ कोटी ७५ लाखांचे गाठले लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड नवनगर प्राधिकरणाने भाडेपट्टयाने वाटप केलेल्या भूखंडांची मालकी आणि ताबा पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे आला आहे. त्यामुळे टाटा मोटर्स कंपनीने दस्त नोंदणी हस्तांतरण शुल्कापोटी महापालिकेकडे १६० कोटी रुपये जमा केले आहेत.
याबाबतची माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. ७ जून २०२१ रोजी पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित झाले. प्राधिकरणाने भाडेपट्टयाने वाटप केलेल्या भूखंडांची मालकी आणि ताबा हा पिंपरी – चिंचवड महापालिकेकडे देण्यात आला.
या भूखंडांच्या हस्तांतरण आणि विविध कामांसाठी महापालिकेने विशेष कक्षाची निर्मिती केली. अपुरी कामगार संख्या, नवीन कामकाज यांमुळे अडचणी आल्या. तथापि, त्यावर मात करत भूमी – जिंदगी विभागाने ३१ मार्च २०२२ या सरत्या आर्थिक वर्षात १६५ कोटी ७५ लाख रुपयांची वसूली केली. त्यात टाटा मोटर्स कंपनीच्या दस्त नोंदणी हस्तांतरण शुल्काचा समावेश आहे.