- राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही सूचना नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२२) :- सोशल मिडीयावर सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून इच्छुकांकडून हे वेळापत्रक व्हायरल केले जात आहे. मात्र, हा संदेश खोटा असून राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप काहीही आदेश आले नसल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हायरल संदेशामध्ये १५ एप्रिलला निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. तर २९ एप्रिलला वॉर्डरचनेची आरक्षण सोडत होणार आहे. १ ते ५ मे या दरम्यान आक्षेप दाखल करणे. १० ते १७ मे ला नामांकन दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. २० मे ला नामांकन अर्ज छाननी होणार आहे तर २० मे ला नामांकन मागे घेण्याची शेवटची संधी असणार आहे. ५ जूनला मतदान होऊन १० जूनला निकाल लागणार असल्याचे व्हायरल संदेशामध्ये सांगण्यात आले आहे
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका सरकारसह विरोधकांनी घेतली. महाविकास आघाडी सरकारने विधीमंडळात विधेयक मंजूर करून केले. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. सद्यस्थितीत या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र अद्याप यावर सुनावणी झाली नाही.
निवडणूक आयोगाकडून अद्याप काहीही आदेश आलेले नाही. सोशल मिडियावर व्हायरल होणारे निवडणुकीचे वेळापत्रक बनावट आहे. नागरिकांनी ते ग्राह्य धरू नये. तसेच पुढे फॉरवर्ड करू नये. हा संदेश खोटा असून निवडणुकीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.
– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त – निवडणूक विभाग…