- यंदा दोन लाखांहून अधिक करदात्यांकडून ऑनलाइनला पसंती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाची करवसुली मार्चअखेर नंतरही सुरू आहे. सद्यस्थितीत ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती आहे. मागील तीन वर्षांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर मागील बारा वर्षामध्ये यामध्ये ४३ टक्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी तब्बल २ लाख २ हजार ७७३ नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सद्यस्थितीत साडेपाच लाखाहून अधिक मालमत्ता आहेत. नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १५ करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. आगाऊ करभरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाते. तसेच ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सन २००९-१० या आर्थिक वर्षांमध्ये फक्त ३ हजार ८३५ नागरिकांनी ऑनलाइन कर भरला होता. हे प्रमाण अवघे २.०६ टक्के होते. २०१४-१५ या आर्थिक वर्षांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी ६१ हजार ९१३ जणांनी ऑनलाइन कर भरला होता. त्यांचे प्रमाण १६.६७ टक्के होते. तर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून यामध्ये आणखी मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी म्हणजेच २०२०-२१ यावर्षी १ लाख ८५ हजार २३६ जणांनी तर यावर्षी तब्बल २ लाख २ हजार ७०३ जणांनी ऑनलाइन कर भरला आहे.
नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर पैसे भरता येतात. कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत नाही. सुरक्षित असल्याने नागरिकांची पसंती मिळते. या अर्थिक वर्षात पालिकेला २८८ कोटी ६२ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आहेत.
– नीलेश देशमुख – सहायक आयुक्त, करसंकलन विभाग…