- रेल्वेकडून अतिक्रमणाची होणार कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात रेल्वे ट्रॅक लगत रेल्वेच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीधारकांना लोणावळा सहायक मंडल अधिकारी अमृत आनंद यांनी नोटीस बजाविल्या आहेत. येत्या १५ दिवसांत झोपडपट्या काढून घेण्याची सूचना केली आहे. झोपड्या काढून न घेतल्यास अतिक्रमण कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात निराधारनगर, वेताळनगर, दापोडी भागात रेल्वे ट्रॅक लगत झोपडपट्टी वसलेली आहे. निराधारनगर भागात २५० रहिवाशी असून यापैकी ६९ झोपडीधारक रेल्वे ट्रॅकलगत त्यांच्या झोपड्या होत्या. अशा झोपडीधारकांवर नुकतीच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. तर वेताळनगर भागातही रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झोपडीधारकांची संख्या आहे. वेताळनगर येथील झोपड्या काढून घेण्याबाबत लोणावळा सहायक मंडल अधिकारी अमृत त्यांनी २८ मार्च रोजी नोटीस बजाविल्या आहेत. तसेच झोपड़ी काढून न घेतल्यास रेल्वेच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
रेल्वे ट्रॅक लगतच्या ६६ अनधिकृत झोपडपट्ट्यांना तर काही झोपडीधारकांना रेल्वेकडून नोटीसा आल्या आहेत. कारवाई झालेले झोपडपट्टीधारक महापालिका प्रशासनाकडे निवाऱ्याची व्यवस्था करण्याची विनंती करत आहेत. यामधील अनेक झोपडपट्टीधारकांकडे फोटो पास देखील आहेत. – अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त झोपडपट्टी पुनर्वसन विभाग…
रेल्वे प्रशासनाने नोटीसा बजाविण्यात आलेली घरे वाचविण्यासाठी घर हक्क संघर्ष समितीची स्थापना केली असून पुढील दिशा ठरविण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची भेट घेण्याच निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. समितीच्या माध्यमातून लोकांच्या घरांसाठी राजकारण विरहित संविधानिक, सनदशीर व अहिंसेच्या मार्गाने संघर्ष उभा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.