- इतर कामांतील दोन कोटींची तरतूद वळविण्यात येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२२) :- आंद्रा – भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत देहू, तळवडे जलशुद्धीकरण केंद्र मुख्य जलवाहिनी निघोजे येथून चिखलीपर्यंत टाकण्यात येत आहे. मात्र, या कामासाठी उपलब्ध तरतूद कमी पडत आहे. त्यामुळे याच प्रकल्पातील इतर कामांतील दोन कोटी रुपये तरतूद मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी वळविण्यात येणार आहे.
आंद्रा – भामा प्रकल्पाअंतर्गत चिखली आसखेड येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी देहू येथून नदीतून जल उपसा करून पाईपलाईनद्वारे पाणी आणणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्यात येत आहेत. कामाअंतर्गत देहू, तळवडे, निघोजे येथून जलशुद्धीकरण केंद्र चिखलीपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. तसेच देहू येथील बोडकेवाडी बंधाऱ्याजवळ अशुद्ध जल उपसा केंद्र ते चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत रायझिंग मेन टाकण्यात येणार आहे. या कामाची तातडीची गरज लक्षात घेता सन २०२१-२२ ची २९ कोटी ५० लाख रुपये ही सुधारित उपलब्ध तरतूद कमी पडत आहे. त्यासाठी याच कामासाठी प्रकल्पातील इतर कामांतून दोन कोटी रुपये तरतूद वळविण्यात येणार आहे. त्यामुळे हा खर्च ३१ कोटी ५० लाखांवर पोहोचला आहे.
भामा – आसखेड धरणावरील अशुद्ध जल उपसा केंद्रापासून नवलाख उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची रायझिंग मेन टाकण्यासाठी सन २०२१-२२ ची सुधारित उपलब्ध तरतूद २५ कोटी ८४ लाख रुपये इतकी आहे. हि ९० लाख रुपये केली आहे. नवलाख उंब्रे ब्रेकप्रेशर टाकीपासून तळवडे देहूपर्यंत १४०० मीटर व्यासाची गुरुत्व नलिका टाकण्यासाठी १८ कोटी ६० लाख रुपये तरतूद आहे. यात १० लाख रुपये घट केली आहे. तर चिखली येथे १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करण्यासाठी अशुद्ध जल उपसा केंद्र व पंपिंग स्टेशन बांधण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पाची १० वर्षासाठी चालन, देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ११ कोटींची उपलब्ध तरतूद आहे. त्यापैकी १ कोटी घट करून केली आहे.












