- राज्य निवडणूक आयोगाच्या धर्तीवर होणार आदेशाची अंमलबजावणी ?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ एप्रिल २०२२) :- आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने आदेश प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२ च्या आदेशानूसार प्रभाग रचना करावी, असे म्हटले आहे. याबाबत प्रभाग रचना तयार करण्याचे पत्र आल्याच्या वृत्ताला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दुजोरा दिला.
नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करुन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करावा. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ व २७ जानेवारी २०२२ च्या आदेशातील कार्यपद्धतीस अनुसरुन करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणूक विभागाने तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना तयार केली. त्यानूसार महापालिकेचे ३ नगरसदस्यांचे ४५ आणि ४ नगरसदस्यांचा १ अशी प्रभाग रचना तयार झाली. तयार केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती-सूचना देखील मागवून त्याची सुनावणी घेतली. निवडणुक विभागाने सुनावणीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सुध्दा पाठविला होता.