न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी आयोजित १६ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेस थेरगाव येथील मैदानावर शानदार सुरुवात झाली.
स्पर्धेचे उदघाटन अमेरिकेचे क्रिकेट सदस्य ऍश्ले डिसुझा ह्यांच्या हस्ते आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांच्या उपस्थितीत पार पडले. ह्या प्रसंगी अकादमीचे प्रशिक्षक, चंदन गंगावणे, शादाब शेख, मोहन जाधव,चिंतामणी वैद्य आणि डॉ.विजय पाटील उपस्थित होते.
दिलीप वेंगसरकर म्हणाले, प्रत्येक खेळाडूने संघ जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. विराट कोहली प्रमाणेच लढवय्येपणा प्रदर्शित करणे गरजेचे असून वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या विजयासाठी प्रयत्न करावे. ऍश्ले डिसुझा ह्यांनी शुभेच्छा देतानाच खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले. स्पर्धेतील सामने वेंगसरकर अकॅडमी, आर्यन्स अकॅडमी आणि डेक्कन जिमखाना या मैदानावर होणार आहेत.