- आतापर्यंत ७५० पेक्षा अधिक अर्ज पालिकेस प्राप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- महाराष्ट्र अनधिकृत गुंठेवारी विकास अधिनियमानुसार पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम नियमितीकरणासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. नागरिकांनी मागणी केल्यास अर्ज स्वीकृतीस पुन्हा मुदतवाढ देण्याबाबत विचार केला जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.
अर्ज स्वीकृतीस पुणे महापालिकेने ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पालिका पुन्हा मुदतवाढ देणार का? या प्रश्नावर आयुक्त बोलत होते. आयुक्त पाटील म्हणाले की, नागरिकांना अर्ज सादर करायचे असतील, तशी त्यांची मागणी असेल, तर पुन्हा मुदतवाढ देऊ. त्यास काही हरकत नाही. प्राप्त झालेल्या अर्जावर बांधकाम परवानगी विभाग व क्षेत्रीय कार्यालयाकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारीच्या माध्यमातून नियमितीकरणासाठी महापालिकेने २० डिसेंबर २०२१ ते २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असे दोन महिने कालावधीत अनधिकृत बांधकामधारकांकडून अर्ज मागविले होते. त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याने अर्ज स्वीकृतींची मुदत आणखी २ महिन्यांनी वाढविण्यात आली. २० एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आतापर्यंत ७५० पेक्षा अधिक अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहे. आणखी अर्ज मिळण्याची शक्यता आहे.