- राजसाहेबांबद्दल बोलण्याएवढी राजकारणात तुमची उंची नाही..
- मनसेच्या रुपेश पटेकरांचा शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांवर प्रतिहल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२२) :- राजसाहेब हे भारतातील लोकप्रिय नेते आहेत. शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांच्या पदाची मर्यादा पिंपरी चिंचवड शहरापुरतीच मर्यादित आहे. आपण महाराष्ट्राचे नेते नाहीत. साहेबांबद्दल बोलण्याएवढी राजकारणात तुमची उंचीदेखील नाही. राजसाहेबांच्या सभेनंतर यु ट्यूब, फेसबुक, वर्तमानपत्र व पोर्टल अशी सर्व मिडिया माध्यमे त्याची दखल घेतात. राज्यातील इतर पक्षांचे वरिष्ठ नेते साहेबांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करीत असतात. राजसाहेब ऋतूप्रमाणे बदलत नाहीत; ते ऋतूप्रमाणे बरसतात असतात, असा टोला पिंपरी-चिंचवड मनसे शहर सचिव तथा महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांनी शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांना लगावला आहे.
रुपेश पटेकर यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ राज साहेबांच्या भाषणाला गर्दी होते; पण मतांमध्ये रूपांतर होत नाही,’ असे खुद्द राजसाहेबांनी अनेकदा आपल्या भाषणात सांगितले आहे. ते पुढे ‘तुमचे मत मिळवण्यासाठी मी राजकारण करत नाही, तर इतर पक्ष महाराष्ट्राला कोणत्या दिशेला घेऊन चालले आहेत, हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर येतो’ ” असेही आपल्या भाषणात सांगत असतात. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर राज साहेबांच्या भाषणाची छाप पडते. ती केवळ त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे. मराठी माणसांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी आणि राज्यातील विरोधी पक्षांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राजसाहेबांनी त्यावर आंदोलन करून ते प्रश्न मार्गी लावलेत. मग शिक्षण, नोकरी, मराठी मुलांच्या परप्रांतीयांनी हिसकावून घेतलेल्या नोकऱ्या असोत. याशिवाय मराठी पाट्यांबद्दल व मराठी भाषेबद्दल उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि आता भोंग्याबद्दल दिलेला उच्च न्यायालयाचा निर्णय अशा कितीतरी विषयांचा त्यात अंतर्भाव आहे. रेल्वे भरतीसाठी मनसेने केलेले आंदोलन आणि महाराष्ट्रातील टोलनाक्यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील ६५ टोलनाके बंद झालेत. त्यानंतर इतर टोलनाके बंद करण्यात आले.
राजसाहेब ऋतूप्रमाणे बदलत नाहीत तर, ते ऋतूप्रमाणे बरसतात. सौंदणकर तुम्ही सर्वप्रथम पिंपरी-चिंचवड शहराचा आणि नंतर राजसाहेबांच्या भाषणांचा अभ्यास करा. आम्हीसुद्धा राज साहेबांचे कार्यकर्ते आहोत. एकाच दिवशी तुम्हाला उंटावरून सगळे ऋतू दाखवू, असे पत्रकात रुपेश पटेकर यांनी म्हटले आहे.
















