न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. २७ जून २०२६) :- इन्स्टाग्रामवर लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेची ५ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ पासून आजपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी महिलेने इन्स्टाग्रामवरील “लग्नासाठी मुलगी पाहिजे” या पोस्टवर क्लिक केले. त्यानंतर रेहान नावाच्या व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधून चॅटिंगद्वारे विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवत त्याने यूकेमधून महागडे दागिने, हिरे, कपडे, फुटवेअर आणि आयफोन खरेदी करून पार्सल पाठविल्याचे सांगितले.
त्यानंतर स्वतःला डीएचएल कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या आकाश वर्मा नावाच्या व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधला. पार्सल भारतात पोहोचल्याचा बनाव करून कस्टम ड्युटीच्या नावाखाली ५ लाख ३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर पार्सलच्या इन्शुरन्ससाठी आणखी ५ लाख ८० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी रेहान, स्वतःला डीएचएल कुरिअर कंपनीचा कर्मचारी सांगणारा आकाश वर्मा तसेच व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या बँक खातेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.















