न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- पीएमपी मार्गावरील बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी आणि अपघात रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ‘ बूम बॅरिअर ‘ (स्वयंचलित फाटक) उभारण्याची चाचणी नुकतीच पिंपरी – चिंचवड शहरात तीन ठिकाणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे, आता बीआरटी मार्गामध्ये होणाऱ्या खासगी वाहनांच्या प्रवेशाला आळा बसणार असून, शहरातील सर्व बीआरटी मार्गावर लवकरच स्वयंचलित यंत्रणा पहायला मिळणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व पीएमपीला जलद वेगाने सेवा देण्याकरिता पीएमपीने बूमची उपाययोजना सुचविली आहे. पीएमपी प्रशासनाने पुणे व पिपरी चिंचवड शहरात एकूण तीन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘ बूम बॅरिअर ‘ बसविण्याचे नियोजन केले आहे. त्यातील तीन ठिकाणी हे बूम बॅरिअर लावण्यात आलेले असून, पिंपरीतील जगताप डेअरी सांगवी फाटा, मुकाई चौकात ‘ बूम बेरिअर’ची चाचणी यशस्वी झाली आहे.
पिंपरीतील जगताप डेअरी चौकात ‘ बूम बॅरिअर’ ची अत्याधुनिक यंत्रणा उभारल्यानंतर त्याची सर्वप्रथम चाचणी घेण्यात आली. यावेळी हे ‘ बूम बॅरिअर ‘ व्यवस्थितरीत्या काम करतात की नाही, हे पाहण्यात आले. चाचणीकरिता खासगी वाहन बीआरटी मार्गातून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन आले की, ‘ बूम बेरिअर ‘ उघडले नाही. त्याचवेळी पीएमपीच्या बीआरटी बस मार्गातून नेताना आपोआपच ‘ बूम बॅरिअर ‘ चे फाटक उघडले गेले. त्याकरिता बीआरटी मार्गावरील सर्व बस वाहनांचे नंबर स्कॅन करण्यात आलेले आहेत. बसची नंबर प्लेट झाल्यानंतरच बस जाण्यासाठी रस्ता खुला होत आहे.
बीआरटी मार्गातील अपघात रोखण्यासाठी ‘ बूम बॅरिअर ‘ बसविण्यात येत आहेत. पुणे व पिंपरीत चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बसविण्याचे नियोजन असून, सांगवी फाटा, जगताप डेअरीतील चाचणी पार पडली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून, लवकरच शहरात सर्वत्र हे बूम बॅरिअर बसविण्यात येतील. – दत्तात्रेय झेंडे, बीआरटी विभाग प्रमुख, पीएमपीएमएल…
















