न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्ग एक, दोन व तीनमधील (अ, ब आणि क वर्गातील) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या व कुटुंबियांच्या मालकी असलेल्या सर्व मालमत्तेची माहिती द्यावी लागणार आहे. ती माहिती ३१ मे रोजीपर्यंत प्रशासन विभागात सादर करावी, असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. मुदतीमध्ये माहिती न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा दिला आहे.
राज्य शासनाच्या ७ जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार महापालिकेच्या वर्ग एक ते तीनमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबियांच्या नावे मालमत्तेची माहिती ३१ मे रोजीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिका आयुक्त पाटील यांनी वरील आदेश काढले आहेत. वर्ग एक ते तीनमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्च २०२२ पर्यंत असलेल्या आपल्या व कुटुंबियांच्या नावे मालमत्ता, दागिने व रोकड तसेच, दायित्वे आदी माहिती वार्षिक विवरणपत्राद्वारे सादर करावे लागणार आहे.
मालमत्तेची माहिती न देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच, पदोन्नती, प्रतिनियुक्ती केली जाणार नाही. तसेच, विदेश दौऱ्यास परवानगी दिली जाणार नाही. विवरण पत्र सादर केल्यानंतरच त्याला पदोन्नती दिली जाईल. सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती जमा करून ती ३१ मे रोजीपर्यंत प्रशासन विभागात सादर करावी, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
















