- एक कॉल करताच पाण्याचा टँकर दारात..
- नवदुर्गा सखी मंच आणि पांडाभाऊ साने युवा मंचचा विधायक उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२२) :- भर उन्हाळ्यात “माझा प्रभाग माझी जबाबदारी; मागेल त्याला मोफत पाणी” हे ब्रीदवाक्य अंगीकारून नवदुर्गा सखी मंचाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई साने आणि पांडाभाऊ साने युवा मंचाने चिखलीतील मोरेवस्ती व परिसरातील नागरिकांची तहान भागविण्याचा विडा उचलला आहे. एका फोन कॉल वर चौका-चौकात पाण्याचा मोफत टँकर उपलब्ध करून दिला जात आहे. त्याने नागरिकांची तहान भागवली जात आहे.
उपक्रमाबाबत माहिती देताना नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपालीताई साने म्हणाल्या, पालिका प्रशासनाच्या दिवसाआड अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे मोरेवस्ती-साने चौक-म्हेत्रेवस्ती-ताम्हाणे वस्तीतील महिला भगिनी आणि पुरुष मंडळी हवालदिल झाली होती. हातातील कामे सोडून त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. प्रशासन जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली होती. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “माझा प्रभाग माझी जबाबदारी; मागेल त्याला मोफत पाणी” हा उपक्रम प्रभागात सुरु केला.
एका फोनवर नागरिकांच्या दारात पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबली आहे. या उपक्रमाबद्दल प्रभागातील माय-भगिनींनी आभार मानले आहेत. तसेच उन्हाळा संपेपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे. गरजू नागरिकांनी पाण्याच्या टँकरसाठी पांडाभाऊ साने जनसंपर्क कार्यालयाशी अथवा 9850507003 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रुपालीताईंनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.