- सवलतींच्या योजनांचा लाभ घ्या; नागरिकांना आयुक्तांचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२२) :-पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत महिलांच्या नावाने असलेल्या निवासी मिळकर्तीवर सामान्य करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय यावर्षीही कायम ठेवण्यात आला आहे. ऑनलाइन भरणा केल्यास १० ते टक्के सूट, शौर्यपदक धारक मिळकतींनाही सूट दिली जाते. मुदतीपूर्वी बिलाचा भरणा केल्यासही मोठी सूट दिली जाते, अशा विविध सवलतींच्या योजनांचा लाभ शहरवासीयांनी घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
महापालिकेकडे एकूण ५ लाख ७१ हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद आहे. मिळकतकरासाठी पालिकेच्या वतीने विविध सवलती दिल्या जातात. निवासी मिळकत महिलेच्या नावावर असल्यास सामान्यकरात ५० टक्के सवलत दिली जाते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण ७ हजार ९९२ महिलांनी त्या सवलतीचा लाभ घेतला आहे. ती एकूण रक्कम २ कोटी २ लाख इतकी आहे. शहरातील घर, बंगला किंवा सदनिका नावावर असलेल्या महिलांनी विभागीय कर संकलन कार्यालयात त्याची नोंदणी करून घेतल्यास सवलतीचा लाभ दिला जातो. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात एकूण २ लाख १ हजार २१६ मिळकतधारकांना एकूण १७ कोटी ८६ लाखांची सवलत पालिकेने दिली आहे.
मालमत्ता कर सवलतीच्या योजना
स्वातंत्र्य सैनिक, महिलांचे नाव असलेली निवासी मालमत्ता, अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के सवलत, संपूर्ण मालमत्ता कराची आगाऊ रक्कम भरणाऱ्यास १० टक्के, ग्रीन बिल्डींग रेटिंग राबविणाऱ्या मालमत्तेसपासून १५ टक्के सवलत, शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा तसेच अविवाहित शहीद सैनिकांचे मालमत्ताकरात १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आल्या आहेत.


















