न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२२) :- शहरवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करून आज महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य स्थापनदिनानिम्मित पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, मकरंद निकम, संजय कुलकर्णी, संदेश चव्हाण, सतीश इंगळे, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, उप आयुक्त संदीप खोत, मनोज लोणकर, अजय चारठाणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुषमा शिंदे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते
आयुक्त राजेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्य स्थापन करताना झालेल्या संघर्षांत मयत झालेल्या व्यक्तींप्रति कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र दिनानिमित्त शहर वासीयांना,कामगार दिनानिमित्त शहरातील कामगार बंधू भगिनींना तसेच येणाऱ्या रमझान ईद , अक्षय तृत्तीया या सणांनिमित्त सर्वांना पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी,सांस्कृतिक तसेच क्रीडानगरीचे शहर म्हणून देशात ओळखले जाते, त्याअनुषंगाने शहराचा देशपातळीवर नावलौकिक वाढविण्याच्या दृष्टिने यशस्वीरित्या प्रयत्न करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थेरगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. शिबिराचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, वाय.सी.एम.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, प्रभाग अधिकारी रविकिरण घोडके, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शंकर मोसंलगी, रक्त पेढी सहाय्यक किशन गायकवाड, कार्यकरी अभियंता देवण्णा गट्टुवार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते. आज सुमारे ६४ बाटल्या रक्त रक्तपेढीत जमा झाले असल्याची माहिती डॉ.शंकर मोसंलगी यांनी दिली.
















