न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मे २०२२) :- पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज स्वच्छता करणेबाबत कार्यवाही करावी, अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करावे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशा प्रकारच्या सूचना आज झालेल्या सातव्या जनसंवाद सभेमध्ये शहरातील नागरिकांनी मांडल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसारआज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तसेच जनसंवाद सभेच्या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ हे आज अ क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित होते.
आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे,रविकिरण घोडके,विजयकुमार थोरात यांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
जनसंवाद सभेत सुमारे ९८ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी आणि सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १२, १० , ७ , ८ , ७ , १२ , १९, आणि २३ नागरिकांनी आपले म्हणणे मांडले.
जनसंवाद सभेमुळे महापालिकेशी निगडीत समस्यांचे निराकरण होत असून नागरिक याबद्दल समाधान व्यक्त करीत आहेत. आठ प्रभागातील आलेल्या सूचना एकत्र करून त्या सूचना संबंधित विभागाकडे पाठविण्यात येत असल्याची माहितीक्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिली.