न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- गेली २ वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे मुस्लिम बांधव ईद घरीच साजरी करत होते. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने देखील ईद पारंपारिकपणे साजरी करण्याचे आदेश दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात रमजान ईद उत्साहात मुस्लिम बांधवांनी साजरी केली. रमजान महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहू अलैही व सल्लम याचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला जातो. या महिन्याची सुरूवात २ एप्रिल रोजी चंद्रदर्शनाने झाली. त्याच्या दुसर्या दिवसापासून म्हणजे ३ एप्रिलपासून लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटातील मुस्लिम बांधवांनी रोजा (उपवास) महिनाभर केला.
या महिनाभरात रोजा, नमाज, रात्रीची तराबिह विशेष नमाज, शबे कद्रची रात्र, कुरआन पठण, जकातुल फित्र आदी संपन्न झाले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली. आज ईदची नमाज पठणापूर्वी प्रत्येकाचे श्रीमंत, सधन आणि चांगली आर्थिक परिस्थिती असणार्यांनी कुटूंबातील प्रत्येक व्यक्तिमागे अडीच किलो धान्य किंवा तेवढी रक्कम कमकुवत आर्थिक परिस्थिती असणार्या गरीब कुटूंबांना दान म्हणून या महिन्यात देण्यात आले. जेणेकरून गरीबातील गरीबाला सुद्धा ईद साजरी करता यावी.
सोमवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. भल्या सकाळीच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मजीद व मदरसाकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी आदी परिसरात मजीद व मदरसामध्ये मौल्लानांनी मुस्लिम बांधवांना नमाज पढविला, नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
चिंचवडगाव येथील आलमगीर शाहिद मजीद मध्ये मौलाना मिनहाज उद्दीन यांनी नमाज पठणाआधी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, तुम्ही या रमजान महिन्यामध्ये जशी शुक्रवारची व रमजान सणाच्या वेळेला जशी नमाज पठण करता तसे न करता नियमित दररोज पाच वेळेस नमाज पठण करावी. तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत. त्याची क्षमा अल्लाह जवळ मागा, सत्याची कास अंगिकारा, मुलांवर चांगले संस्कार आई-वडीलांनी करावे. असे आवाहन करून रमजान सणाची माहिती विषद केली.
यावेळी आलमगीर शाही मजीदचे पदाधिकार्यांनी पोलीस उपायुक्त मंचक अप्पर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून मुस्लिम बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देताना म्हणाले. आज तुमचा मोठा आनंदाचा दिवस आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेली २ वर्षे घरीच ईद साजरी केली. मुस्लिम बांधवांनी एकोपाने राहून एकमेकांच्या सुखःदुखात सामिल होत समाज एकोपाचे दर्शन घडवावे.
यावेळी माजी महापौर आझम पानसरे, निहाल पानसरे यांच्या उपस्थितीत इम्रान पानसरे, अख्तर पिंजारी, नाजीम बसरी, इक्बाल शेख, इक्बाल मुलानी आदींनी संयोजन केले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
निगडी येथील नुरानी मजीदमध्ये मौल्लाना शाहीद सलाम रेहमान व हाफिज जहुर अहमद यांनी नमाज पढविला. तेथे रशिद शेख, लियाकत शेख, मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी व्यवस्थापन केले. आकुर्डीत मदिना मजीद, अक्सा मजीद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातीमा मजीद, नुरूल इस्लाम मजीद, कस्तूरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मजीदमध्ये नमाज पढविण्यात आला.
चिंचवड स्टेशन येथील दवा बाझार येथील समा ए दिन ए आदब मजीदमध्ये नमाज पठण झाले. अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार, जाकीर मेमन, राजमहम्मद अत्तार, फिरोज पठाण, मोहसीन मुल्ला, जहीर सय्यद, निहाल शिकलगार, आशरफ जमादार आदी उपस्थित होते.
चिंचवड स्टेशन येथील जामीया गौसीया मजीदमध्ये मौल्लाना फैज अहमद फैज यांनी नमाज पढविला. रमजान ईदच्या नमाज पठणानंतर शहरातील विविध ठिकाणच्या कब्रस्थान येथे मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जावून त्यांना आदरांजली वाहिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी शिरखुर्मा, शेवय्या गोड आहाराचा स्वाद, नातेवाईक, मित्र मंडळींनी घेतला. त्यात सर्व धर्मियांचा समावेश होता. त्यांना त्याप्रसंगी ईदच्या शुभेच्छा दिल्या.


















