- मनसे अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून उचलबांगडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोग्यावरून अल्टिमेटम दिल्याने पिंपरी – चिंचवड शहर पोलीस अलर्ट झाले आहेत. शहरातील मनसेच्या ४० ते ५० पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून मंगळवारी नोटीसा बजावण्यात आल्या तर, आज बुधवारी (दि. ४) रोजी शहरात कायदा व सुव्यवस्था न बिघडवता शांतता राखावी यासाठी शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
राज ठाकरे यांच्या अल्टिमेटममुळे राजकीय वातावरण तापले आहे. शहरातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत मंगळवारी नोटीसा बजावल्या होत्या. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना सकाळी ६ वाजता त्यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनसेचे उपशहराध्यक्ष विशाल शिवाजी मानकरी, विद्यार्थी सेनेचे भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक प्रकाश शिंदे तसेच रोहिदास शिवणेकर यांना निगडी पोलिसांकडून अटक केली. दिघी पोलीस स्टेशनकडुन अंकुश तापकीर यांना अटक केली. मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधान सभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे यांना चिंचवड पोलीस यांनी ताब्यात घेतले. मनसे वाहतूक सेना शहरध्यक्ष सुशांत साळवी, सिमा बोलापुरकर, अश्विनी बागर, अनिता पांचाळ, रुपेश पटेकर, राजु सावळे, दत्ता देवतरासे, नितिन चव्हाण यांनाही पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


















