न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२२) :- स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय प्रशासक राजेश पाटील यांच्या निर्णयार्थ आजच्या बैठकीत ठेवण्यात आले होते. या विषयांना प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. प्रशासक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. बैठकीस विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम व नेमणुकीची पध्दत आणि टक्केवारी यामध्ये नामनिर्देशनाने ७५ टक्के तर पदोन्नतीने २५ टक्के यानुसार प्रमाण निश्चित करण्यास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.
मनपा हद्दीतील पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास दिले जातात. यापोटी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता पीएमपीएमएल ला ३२ लाख ७७ हजार रुपये अदा करण्यास प्रशासक राजेश पाटील यांनी आज मंजूरी दिली. कोकणे चौकातील आणि थेरगाव येथे नव्याने विकसित केलेले मध्यदुभाजक सुशोभिकरणाची देखभाल करण्यासाठी येणाऱ्या ५ लाख ५७ हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता दिली. महानगरपालिकेचे निघोजे-तळवडे येथील नियोजित अशुद्ध जलउपसा केंद्र आणि चिखली येथील प्रकल्पांकरिता उच्चदाब वीजपुरवठा घेण्यासाठी विद्युत विषयक कामांतर्गत चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करण्यासाठी २२ केव्ही वीजवाहिनी टाकणेकामी आवश्यक ९ कोटी ३२ लाख ६ हजार रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली.
प्रभाग क्र. २१ मधील नव्याने होत असलेल्या रस्त्यावर दिवाबत्ती व्यवस्था करण्यासाठी ३४ लाख २ हजार रुपये खर्च होणार आहे. तसेच प्रभाग क्र. १८ मध्ये उंच पाण्याची टाकी बांधण्यासाठी येणा-या खर्चास ३ कोटी ११ लाख ८८ हजार रुपये खर्च होईल. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेसाठी विविध विभागाच्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पुस्तकांची खरेदी करण्यासाठी १७ लाख ६५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चास प्रशासक पाटील यांनी आजच्या बैठकीत मंजूरी दिली.