न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२२) :- आकुर्डी येथील थरमॅक्स चौकात सोमवारी अतिक्रमणविरोधी पथकाने धडक मोहीम राबवून टपऱ्या हातगाड्यांसह, अनधिकृतरित्या बांधण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त केली.
गेल्या अनेक वर्षांपासून हे टपरीधारक, हातगाडी व खासगी कार्यालयात व्यावसाय करीत होते. या चौकातून चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी जाणाऱ्या कामगार वर्गाची ये – जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या चौकात बस, मालवाहतूक करणारे ट्रेलर्स आदी वाहनांची तसेच पायी चालणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी अनेकांनी विविध प्रकारची दुकाने टपरीतून, हातगाडीतून दुतर्फा थाटली आहे. परिणामी रस्त्याच्या हा मार्ग वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला होता.
येथील मार्गावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या अ व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली.