न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महिला, मागासवर्गीय, निराधार, अनाथ बालके आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी विविध कल्याणकारी अशा एकूण ३४ योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांमध्ये कालानुरूप बदल व सुधारणा करण्यात आल्या आहेत. सहा योजना नव्याने सुरू केल्या असून, सात योजना रद्द करण्यात आल्या आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १०) सांगितले.
आयुक्त पाटील यांनी सांगितले की, नवीन योजनेमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या युवक व युवतींना विविध प्रशिक्षण देण्याची आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या महिला बचत गटांना अनुदान दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना दरमहा ३ हजार पेन्शन दिली जाणार आहे. महिला बचत गटांना अनुदान दिले जाणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. आता ते बक्षीस इतर खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. प्रतिसाद नसल्याने मागासवगीय गृहनिर्माण योजना रद्द केली आहे. दोन मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबास मदत ही योजना रद्द केली आहे. महापालिकेच्या वायसीएम व इतर रुग्णालयात प्रसुती होणाऱ्या शहराबाहेरील महिलांनाही पालिका मदत देणार आहे. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांना दिलेली जाणारी शिष्यवृत्ती दोनऐवजी विविध अभ्यासक्रमांना देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या कल्याणकारी योजनांबाबत टाटा स्ट्राईव्ह कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यांनी पुढील ५ वर्षांचा व्हिजन अहवाल दिला आहे. त्यानुसार पालिकेने जुन्या व प्रतिसाद नसलेल्या योजना बंद केल्या आहेत. काही योजनांमध्ये कालानुरूप बदल केले आहेत. काही नव्या योजनांचा समावेश केला आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.