न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मे २०२२) :- कासारवाडीमधील JRD टाटा उड्डाणपूल हा पिंपरी चिंचवड शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे. त्यासाठी कासारवाडी येथील स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करत शहराच्या विकासकामाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडे थोडक्याच जमिनी राहिल्या आहेत व त्यावर दुकाने थाटून भाड्याने देऊन तिथली स्थानिक आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंडिया क्लॉथ पासून शंकरवाडी पर्यत असणाऱ्या सर्व दुकानदारांना नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. ती जागा महानगरपालिकेकडे द्यावी त्याबदल्यात त्यांना योग्य तो मोबदला व TDR दिला जाईल, अशी भूमिका आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली आहे.
त्याला विरोध दर्शवत आ. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी व स्थानिक आज आयुक्तांना भेटले व वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करण्यास तिथले व्यापारी सहकार्य करतील मात्र आपण स्थानिकांच्या रोजीरोटी वर गदा येईल असा निर्णय घेऊ नये, अशी ठाम भूमिका मांडली.
माजी उपमहापौर डब्बू आसवानी, सामाजिक कार्यकर्ते सतीश लांडगे, मा नगरसेविका सुरेखा लांडगे यांनी स्थानिकांची व व्यापाऱ्यांची बाजू लावून धरली. अखेर बनसोडे यांनी मध्यस्थी करत प्रशासन -स्थानिक- व्यापारी हे एकमेकांना विश्वासात घेऊन कोणाच्याही हक्कावर गदा न येता सहकार्य करतील व त्याप्रमाणे पुढील निर्णय घेतील, असे सांगितले व त्याला आयुक्त राजेश पाटील यांनी देखील दुजोरा दिला.
आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, डब्बू आसवानी, सुरेखा लांडगे, प्रसाद शेट्टी, जितेंद्र लांडगे, भाऊसाहेब लांडगे, रतन लांडगे, सतीश लांडगे यांच्या सह इतर व्यापारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.