- मुख्यमंत्र्यांसह कृषिमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- चऱ्होली येथील वडमुखवाडी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्या (सोमवार) दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
रामेती पुणे आणि वनामती नागपूर या राज्यस्तरीय शिखर संस्थेच्या अधिनस्त कार्यरत आहे. संस्था दौंड येथून चऱ्होलीत स्थलांतरीत करण्यात आली. पुणे येथे प्रशिक्षण हॉल व प्रशिक्षणार्थीची निवास व्यवस्था इत्यादीची गैरसोय होत होती. तालुका बिज गुणन केंद्राच्या मालकीच्या १२.३१ हेक्टर प्रक्षेत्रापैकी ६ हेक्टर क्षेत्र रामेती पुणे या संस्थेस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रामेती पुणे संस्थेची सर्व अपेक्षीत बांधकामे पूर्ण झाली आहेत. २ हजार १४५.२९ चौ.मी. क्षेत्रावर प्रशासकीय भवन उभारण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर एकूण ९ कक्ष असून २ प्रशिक्षण सभागृह, ६ सिंडीकेट रूम ग्रंथालय आहे.


















