न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२२) :- महापालिकेत प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रतिनिधींची कुलुपबंद असलेली दालने बुधवारपासून अधिकाऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. सभागृह नेत्यांचे कार्यालय अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उपमहापौरांचे कार्यालय सहआयुक्त आशादेवी दुरगुडे आणि विधी समिती सभापतींचे कार्यालय उपायुक्त सचिन ढोले यांना देण्यात आले.
पिंपरी – चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा १३ मार्च २०२२ रोजी कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे महापालिकेत आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पदाधिकाऱ्यांची दालने कुलूपबंद करण्यात आली होती. जोपर्यंत प्रशासकाचा कार्यकाळ आहे तोपर्यंत अधिकाऱ्यांना ही दालने वापरण्यासाठी द्यावीत, अशी मागणी होत होती.
त्यानुसार प्रशासक पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांना सभागृह नेत्यांचे कार्यालय, उपमहापौरांचे कार्यालय सहआयुक्त आशादेवी दुरगुडे आणि विधी समिती सभापतींचे कार्यालय उपायुक्त सचिन ढोले यांना दिले आहे.
















