न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२२) :- पावसाळ्यात शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणांची यादी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत असते. त्याप्रमाणे यंदाही शहरातील ११ पूरप्रवण ठिकाणांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील वाकड, दापोडी, सांगवी, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी आणि चोवीसावाडी या गावांचा समावेश आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिका-यांनी मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर मुख्यालयात थांबण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहत आहेत. या नद्यांपैकी पवना नदीच्या पुराचे पाणी प्रामुख्याने चिंचवडगाव आणि पिंपरीतील काही भागाला दरवर्षी पुराचा धोका असतो. मुळा नदीचे पाणी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर या भागात अनेक वेळा घुसले आहे. यंदा मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यातील पूर्व कामे महापालिकेच्या वतीने युध्दपातळीवर सुरू आहे. शहरातील नालेसफाई सुरू असून ५ जूनपूर्वी हे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाने उदिष्ट ठेवले आहे.