- प्रलंबित भूखंड व सदनिका हस्तांतरण शुल्काची होणार जुन्याच पद्धतीने आकारणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण शासनाने विसर्जित केले होते. त्यानंतर प्राधिकरणाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या भूखंडाची मालकी व ताबा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला. परंतु, त्याचे प्रत्यक्ष कामकाज हे ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाले. कोरोनामुळे व सुरवातीच्या काळात पुरेसा कर्मचारी वर्ग न उपलब्ध होऊ शकल्याने भूखंड व सदनिका हस्तांतरण प्रकरणे वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित होती.
दरम्यान १ एप्रिल २०२२ पासून हस्तांतरणाचे दर वाढले होते. या प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही होत असताना त्याची आकारणी नवीन दरानुसार होत होती. याचा फटका प्राधिकरणातील नागरिकांना होत होता.
आ. अण्णा बनसोडे यांनी आयुक्तांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली होती. ३१ मार्च २०२२ पूर्वीची दाखल प्रकरणांना जुन्या दराने हस्तांतरण फी आकारावी अशी मागणी आ. अण्णा बनसोडे यांनी केली होती. याबाबत मंगळवारी (दि. १७) रोजी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून प्रलंबित प्रकरणांवर हस्तांतरण फी जुन्या पद्धतीने आकारावी, असा आदेश दिला. यामुळे नागरिकांचे लाखो रुपये वाचणार आहेत.
















