न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२२) :- स्थायी समिती आणि महापालिका सभेची मान्यता आवश्यक असलेल्या सुमारे ११ कोटी ८८ लाख ८३ हजार रुपये खर्चाच्या विविध विषयांना आजच्या बैठकीत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली. आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
थेरगाव येथील स्मशानभूमीतील गॅस दाहिनीच्या चालन देखभाल दुरुस्ती करण्याकामी येणाऱ्या ५० लाख रुपये खर्चास आयुक्त पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली. पिंपरीगाव येथील भैरवनाथ मंदिर इमारतीच्या नूतनीकरणांतर्गत विद्युतविषयक कामे करण्यासाठी ८७ लाख ३० हजार रुपये सुधारित खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्र. २० मधील कासारवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा बांधण्याकामी आवश्यक विद्युत विषयक कामे करण्यासाठी २ कोटी २४ लाख ५१ हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ४६ मधील काळेवाडी येथील मुख्य रस्त्यावर विद्युतविषयक कामे करण्यासाठी आवश्यक १ कोटी २८ लाख ९९ हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. या विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती.
स्थायी समितीची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये सेक्टर क्र. २२ मधील जाधववाडी येथील शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या पंपहाऊसच्या दुरुस्तीकरीता येणाऱ्या ३५ लाख ९६ हजार रुपयांचा खर्च, अग्निशामक विभागामार्फत मनपाच्या विविध रुग्णालयांकरिता आवश्यक फिक्स्ड व हॅ॑ड हेल्ड गॅस डिटेक्टर साहित्य खरेदीकामी ७ लाख १९ हजार रुपये खर्च, प्रभाग क्र. २१ मध्ये पिंपरी येथील जोग महाराज उद्यानात म्युरल्स करणे तसेच त्या अनुषंगिक स्थापत्य तसेच इतर उद्यानांची स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी येणा-या ४० लाख रुपये खर्चाचा समावेश होता.
सेक्टर क्र. २३ येथील पाणी शुद्धीकरण आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी आवश्यक असलेला द्रवरूप क्लोरीन वायू पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या ३१ कोटी १२ लाख रुपये खर्चास, आरोग्य विभागासाठी आवश्यक असणाऱ्या ढकलगाड्या खरेदीसाठी १९ लाख रुपये खर्चास, रावेत येथील मनपाच्या अशुद्ध जलउपसा केंद्राच्या पंपिंग पद्धतीने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तसेच इतर अनुषंगिक कामांसाठी ५१ लाख ३४ हजार रुपये खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, आकुर्डी रुग्णालय, थेरगाव रुग्णालय आदी रुग्णालयांच्या नवीन इमारतींमधील अंतर्गत आणि बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई तसेच स्वच्छता विषयक कामे करण्यासाठी ३ कोटी २२ लाख ६७ हजार रुपये खर्चास आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.












