न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोग (दि. २१) पुण्याला भेट देणार असून, जिल्ह्यातील नागरिकांना आयोगाच्या भेटीच्या वेळी मते मांडता येणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात यासाठी नोंदणी करता येणार असून, नागरिकांना नोंदणी करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन शाखेत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे, एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत आयोग भेट देणार आहे. या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील. नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी ६ वाजेपर्यंत नावाची नोंदणी करावी. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या [email protected] किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या [email protected] या ई – मेलवरदेखील नोंदणी करता येईल, असे नगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त दत्तात्रय लाघी आणि जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे यांनी सांगितले.