न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२२) :- प्लास्टिकविरोधात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचे पथक शहरात कारवाई करीत आहे. कारवाई दरम्यान पिंपरी मार्केटमध्ये पथकाने ८ ते ९ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली.
एका ड्रायफुडच्या दुकानात कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक वादावादी झाली. व्यापाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घातली. त्यामुळे काहीकाळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाईच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुपारी १ ते अडीच वाजेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवली. आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने खुली केली.
दरम्यान काही ठिकाणी पाच हजार तर काही ठिकाणी दोन हजार रुपयांच्या दंडात्मक पावत्या फाडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. आमच्याकडे प्लास्टिक नियमानुसार वापरण्यास परवानगी असलेल्या जाडीच्या बॅगा आहेत, असे असतानाही कारवाई कशी केली जाते? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला.
















